मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

चारपाई

उत्तर भारतात कुठल्याही गावात जा. शेतकरी शेतात गेलेला असेल, घरातील मुलं शाळेत असतील, आजूबाजूला अगदी कुत्रा-मांजर जरी नसल, तरी एक बाई मात्र तुमच्या स्वागताला कायम अंगणात तत्पर असतील...चारपाई-बाई!


चांदण्या रात्री चारपाई वर झोपून तारे-ग्रह  मोजायची केलेली कसरत, आजीच्या कुशीत बसून ऐकलेल्या गोष्टी, मुलांनी घातलेला धूडगुस...अशा एक न अनेक आठवणी जडलेल्या असतात तिच्याबरोबर. काथ्याने लाकडाच्या चौकटीवर विणलेल्या चारपाईचा  उपयोग केवळ बसण्या-झोपण्यापुरता नसून, अनेक कामाकरीता होतो. वाळवण घालण्यासाठी, कधी आडोसा तर कधी कुंपण म्हणून, स्टंप तर कधी स्ट्रेचर म्हणून, कधी काही वाहवून नेण्यासाठी, घराच्या जन्म-मुत्यु सोहळ्यात चार पायांवर जणू त्या कुटुंबातील  आणि खूपवेळा गावातील घटनांच्या  मूक साक्षीदारच असतात.

पण या चारपाईला सुद्धा माणसाने मानपानातून, नियम-बंधनातून  सोडलेल नाहीये.
मागच्या आठवडयात कानपुर जिल्ह्यातील रसूलाबाद ब्लोक मधील कुरुंगना म्हणून एका छोट्या खेड्यात गेलो होतो...अतिशय टुमदार गाव. कामानिमित्त गावातील आशा (Accredited Social Health Activist) बरोबर गप्पा मारीत असता, एका गरोदर बाई च्या अंगणी आलो. दारात चारपाई होतीच. म्हणून त्यावर बसलो. माझ्या बरोबराची आशा कार्यकर्ता खाली जमिनीवर बसू लागल्या, म्हणून त्यांना म्हटल, ' तुम्हीही वर बसा.'
तशा त्या बाई म्हणल्या, ' मी या गावाची सून आहे.'
मी, ' मग तर तुम्ही बसायलाच हव यावर.'
कार्यकर्ती,' नाही बेटा, तो मान या गावातील मुलींचा. गावातले, सानथोर येतात जातात, कुणी पाहिल तर बर नाही दिसत.'
क्षणात विचार आला, आई शप्पथ! केवढ हे रूढी-परम्परांच  जोखड!

गेल्या वर्षी राजस्थान मधील चुरू जिल्ह्यात एका संशोधन प्रकल्पावर  काम करीत असताना असाच अनुभव आला. मेहरासर नावाच एक छोट गाव आहे; सरदार-शहर जवळ. साधारण संध्याकाळची  वेळ होती, संशोधनाचा एक भाग म्हणून ३०-४० गावकरी जमवले होते. जमिनीवर कस बसवणार म्हणून दोन-तीन चारपाई आणल्या इकडच्या-तिकडच्या घरातून! एकेक गावकरी येऊ लागला तसे आम्ही त्यांना बसण्याची विनंती करीत होतो. पण ४-५ गावकरी कितीही विनंती केली तरी चारपाई वर बसायला तयार होईनात . आणि आम्हीही आग्रह करायचा सोडत नव्हतो. तेंव्हा बरोबर असलेला key-informant मला बाजूला घेउन म्हणाला, "सर, ते खालच्या जातीचे लोक आहेत. तुम्ही कितीही विनंती केली तरी ते चारपाई वर उच्च जातीच्या लोकाबरोबर  बसणार नाहीत. ते गावाच्या नियमाबाहेरच आहे."
अशावेळी कुणाला काही सांगताही येत नाही. मूकपणे स्वत: ला त्या रिती-रिवाजाचा भाग करावा लागत आणि जातीच भूत मानगुटीवर बसवून घ्याव लागत! चारपाई तर इतरांच ओझ वहाता-वहाता वर्षानुवर्षे रिती-रिवाजाच ओझ मुकाटपणे  सोशीतच आहे.