शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

आमची माती आमची माणस!

पाषाण सारख्या पुण्याजवळच्या गावात वीसेक वर्ष राहिल्याने, कधीही चाळी-चौकातल्या मित्रांबरोबर भटकंती करायला पुण्याच्या आजूबाजूच्या गावात फिरण्याची सवय लहाणपणीच जडल्याने, खेड्या-पाड्यांमधील जगण मला नविन नाही. पण तेंव्हा केलेली मुशाफिरी आणि गेल्या पाचेक वर्षापासून social development क्षेत्रात संशोधनाचे काम करीत असताना खेड्यापाड्यांची नव्याने झालेली ओळख यात खूप अंतर जाणवल. विशेषत: उत्तर भारतातील जवळजवळ सर्व राज्यातील दुर्गम गावांत फिरताना; तेथील सामजिक-राजकीय जीवनात डोकावून बघताना नवनविन अनुभव येताहेत, काही गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहेत; काही वाचल्या-पाहिलेल्या संदर्भाना पडताळता येतय. विविध जाती-धर्माच्या, वेगवेगळ्या उत्पन्न गटाच्या लोकांबरोबर संवाद साधत असताना, India आणि भारतातील दरी अजून कशी खोल-खोल होत आहे, हे स्पष्ट अनुभवायला मिळत आहे. नागरी आणि ग्रामीण संवेदना, लिंगभाव, जातीभेद, शिक्षण क्षेत्रातील दुर्दशा, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी वणवण, आरोग्याच्या सोयिसुविधांची वानवा, सरकारचा दुजाभाव...अशा एक ना असंख्य समस्यांमुळे जगण्यासाठी झगडा करणारा ग्रामीण भारतीय...आणि प्रत्येकवेळी त्याची आणि स्वत:ची नव्याने मला होणारी ओळख!
एका बाजूला संशोधन आणि त्याचे ethics, त्यातून निर्माण होणारी द्विधा मन:स्थिती-हतबलता, विविध development प्रकल्प...काही यशस्वी तर काही पैशाचा अपव्यय, काही तेजीत चालणारे-काही थंडावलेले, कधी संसाधनांची कमतरता तर कधी sustainability चा प्रश्न , संशोधकाचा data पायी असणारा अप्पलपोटेपणा, वेगवेगळ्या स्तरांवर काम करणार्‍या NGOs आणि त्यांची कामे आणि ती पूर्ण करण्याची पद्धत, NGOs मधील राजकारण, पैशाची मदत करणार्‍या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांची गटबाजी...अस काहीस Grey World! तर दुसर्‍या बाजूला वेगवेगळ्या हंगामातील ग्रामीण निसर्ग, सण-समारंभ, त्यातील अद्भुतता असा दुहेरी पण भरपूर काही देणारा अनुभव येत आहे. कामाच्या रेट्यात काही टिपलेल्या गोष्टी, संवाद, कडू-गोड आठवणी, वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या व्यक्ती आणि वल्ली मनात घर करून आहेत, तर काही पुसट होत चालल्याहेत. संशोधनावर आधरित reports, articles, आणि papers लिहीण चालूच आहेत, पण त्या चौकटीत न बसणार, पण तरीही भरपूर देणार, सम्रुद्ध करणार सुटून जाऊ नये म्हणून हा blog चा प्रपन्च! कधी चार-पाच वर्ष मागे जाऊन टिपलेलं काही, तर कधी सध्याच्या प्रकल्पावर काम करीत असताना केलेल्या नोंदी! अमेरिकेत शिक्षण घेण्यापूर्वी आणि घेतल्या नंतर केलेलं काम, त्यातून आलेलं वेगवेगळ्या गोष्टींच भान; असं आणि बरच काही असलेला हा माझा blog...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा