शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

सारस पक्षी

सध्या मी काम करीत असलेल्या संस्थेचा उत्तर प्रदेशमध्ये काम करणार्या  श्रमिक भारती या NGO बरोबर एक संशोधन प्रकल्प नुकताच सुरु झाला आहे. त्या निमित्ताने मला मागच्या महिन्यात दोनदा कानपूर देहात या जिल्ह्यातील काही गावांना भेटी द्याव्या लागल्या. कानपूर शहर ते  कानपूर देहात असा साधारण ७०-९० km चा प्रवास आहे. जाताना माझ्याबरोबर German सहकारी...Christina होती. शहरातून गावाकडे भरधाव वेगाने निघालो; तरीही गावाकडील संथपणा अंगात भरू लागला. सकाळच्या वेळी  शहरापासून जस-जसे दूर जाऊ लागलो तस-तशी कामावर जाणारयाची घाई, शालेत जाणारया मुलांची फौज तुरलक होऊन  दूरवर पसरलेली हिरवी शेती दिसू लागली. अंगावर गावाकडचा भणान वारा घेत असतानाच मला कधी झोप लागली ते समजलच नाही.
जाग आली ती सोबत असणार्या Christina च्या आवाजाने, "सचिन, लवकर उठ. तो बघ केवढा मोठ्ठा पक्षी!"
तिने ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला लावली. मी डोळे उघडून पाहिले तर साधारण १०० मीटर अंतरावर एक भल्या उंच पक्ष्याचे देखणे जोडपे शेतात उभे होते! साधारण ५-६  फूट उंची...करड्या रंगाचे; सुरइसारखी गर्दन (मान नाहीच ती!) गर्दनीचा वरचा भाग आणि डोके गडद लाल रंगाचे! गव्हाळ रंगाचा मुकुटासारखा शोभणारा माथा. करडे पंख आणि त्यांना काळी गर्द किनार! तांबूस गुलाबी लाम्बच लाम्ब पाय...अशी देखण्या पक्षांची जोड़ी आमच्या समोर उभी होती. पूर्वी कधीही न पाहिलेला असा तो पक्षी! पाषाणच्या तलावावर हिवाळ्यात असंख्य पाहुण्याम्ची गर्दी व्हायची...पण तिथेही कधी न पाहिलेला असा  कोणता हा पक्षी? तेवढ्यात ड्रायव्हर ने सांगितले की हा सारस पक्षी आहे.

सारस...चटकन रामायणातील वाल्मिकीची गोष्ट आठवली. अस म्हणतात की, एका पारध्याला सारस पक्ष्याची शिकार करीत असताना पाहून वाल्मिकीने त्याला शाप दिला. मरत असणारे सारस पाहून वाल्मिकीला रामायण सुचले.
सारस पक्ष्यामध्ये वैवाहिक नीती (marital virtues) अगदी काटेकोरपणे पाळली  जाते.  जोडप्यातील एकाच्या मृत्युनंतर दूसरा पक्षीही लवकरच विरहवेदनेतून मरण याचना करतो.  आणि म्हणूनच की काय गुजरातमध्ये  नवविवाहित जोडप्याला सारस पक्ष्याची जोड़ी दाखवण्याचा रिवाज आहे.
गाडीतून उतरून अधाश्यासारखे फोटो काढायला सुरुवात केली. जेव्हापासून camera घेतला आहे तेव्हापासून एक फार वाईट सवय लागली आहे. निरीक्षण करणयाअगोदर , समोर पहात असलेल मनात कोरण्याअगोदर camera मध्ये टिपायची...बंदिस्त करायची घाई होते. तसा ड्रायव्हर म्हणाला, "वाटेत भरपूर दिसतील, " तेंव्हा आम्ही पुढच्या प्रवासाला  निघालो. माझी फोटो काढण्याची हौस पाहून तो माहिती देऊ लागला, "सारस मादी विणीच्या हंगामात २ दिवसाच्या अंतरात दोनच अंडी घालते आणि मग साधारण एक महिनाभर अंडी उबवल्यावर सारस पक्षी जन्म घेतात."
मी Christina ला म्हणालो, माझ्याजवळ जादूची कांडी हवी होती, म्हणजे मी चटकन सारस पक्षी झालो असतो. एका जोडीदाराला शोधले की आयुष्यभर चिंता नाही!  तशी  तिच्यातील  German बोलली, "तुला काय माहीत त्यांच जीवन किती कष्टाच आहे. दिवसभर उन्हातान्हात उभा रहा, माणूस नावाच्या  प्राण्यापासून  स्वतःचा बचाव करीत फिरा."

 रस्त्यावर जिथे कुठे सारस दिसत होते, त्याप्रत्येकवेळी "अहा हा ! ओ हो हो!" करीत होतो.
रात्री निवांत वेळ मिळाला तेंव्हा श्रमिक भारतीच्या कार्यकर्त्याबरोबर  चर्चा करीत असताना सारस पक्ष्याबद्दल  आणखी माहिती मिळाली.
उत्तर भारतात पावसाळयानंतर हे पक्षी भाताच्या खाचारत आढळतात. कीडे, मासे, बेडूक आणि पाणवनस्पती  हेच त्यांच अन्न. कधीकधी ते दुसरया पक्ष्याची  अंडीही खातात. प्रजनन काळात ते आपल्या जोडीदाराला मोठमोठयाने साद घालतात.  जोडपी  नृत्य-गाण्यात मग्न होतात. भाताच्या खाचारात किंवा दलदली मध्ये गवाता-चिखालाची मोठी घरटी बनवतात. मादी एक किंवा दोन अंडी घालते. कावळे  मात्र त्यांची अंडी खायला टपून असतात.
तो कार्यकर्ता सांगत होता, जगभरात सारस पक्ष्याची संख्या रोडावत चालली आहे.
लगेच माझा प्रश्न, "अजून कुठे आढळतात हे पक्षी?"

त्याच ही तितकच तत्पर उत्तर, " तुमच्या नाशकात, गोदावरी तीरी आढळतात; थायलंड, फिलिपिन्स, बर्मा आणि ऑस्ट्रेलिया या देशात वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. तो पुढे सांगू लागला, देशात कमी होणारी यांची संख्या हा गंभीर प्रश्न आहे. इथे हा पक्षी भाताच्या शेतीचे नुकसान करतो, पण रामायणातील उल्लेखामुले, शेतकरी याला फारस मारीत नाहीत.  प्रदूषण, शिकार, वाढते शहरीकरण यामुळे  जगभरात त्यांची कमी होत आहे".

"मग हा पक्षी वाचवायला हवा," मी.

तो कार्यकर्त्ता, " Wildlife Conservation society ने हा पक्षी दुर्मिळ पक्षी म्हणून घोषित केला आहे आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. भारतातही वाढत शहरीकरण, शिकार यामुळे संख्या कमी होत आहे. सारस पक्षी रामायणातील उल्लेखापुरता मर्यादित रहाण्याअगोदरच निसर्ग संवर्धनाद्वारे त्याला संरक्षण देण गरजेचे आहे...आणि त्याकरिता  सगळ्याम्नी प्रयत्न करण गरजेचे आहे."   

यावर सगळ्यानी माना डोलावल्या आणि आपापल्या रुमची वाट धरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा